Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Saturday 29 October 2022

भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल

 

भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल




भारताचे एकीकरणाचे थोर शिल्पकार वल्लभभाई जव्हेरबाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर, १८७५ रोजी गुजराथमधील नडियादजवळच्या करमदरा गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. १८९७ साली वल्लभभाई मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. घरची गरिबी असल्यामुळे अत्यंत कष्टाने त्यांना शिक्षण घ्यावे लागले. ते अतिशय मेहनती य बुद्धिमान होते. कशी तरी उधार-उसनवार पैशाची जमवाजमव करून ते इंग्लंडला गेले व १९१३ साली बॅरिस्टर होऊन भारतात

परत आले. त्यांनी अहमदबादला काही दिवस वकिली केली. एक उत्तम वकील म्हणून त्यांचा नावलौकिक मोठा होता. गांधीजींच्या देशसेवाकार्याने प्रभावित झालेल्या वल्लभभाईंनी वकिली व्यवसाय सोडून दिला. गांधीजींचे शिष्यत्व स्वीकारून त्यांनी देशकार्य करण्याचा निश्चय केला. ही घटना १९२० सालची. त्याअगोदर १९१७ साली ते अहमदाबाद नगरपालिकेत बिनविरोध निवडून आले. तीन वर्षे स्थानिक स्वराज्याच्या राजकारणाबरोबर त्यांनी काँग्रेसचे कार्य सुरू केले.

खेडा जिल्ह्यात नद्यांच्या महापुरामुळे जनजीवन उद्वस्त झाले. हजारो लोक बेघर झाले. वल्लभभाई तेथे धावत गेले. लोकांच्यासाठी अन्न-कपडे गोळा करून त्यांनी पुनर्वसनाचे कार्य केले.

बार्डोलीचा शेतकऱ्यांचा सत्याग्रह हे वल्लभभाईंच्या जीवनातील एक महत्त्वाचे कार्य. १९२८ साली गुजराथेतील बार्डोली नावाच्या भागातील शेतकऱ्यांचा शेतसारा सरकारने विनाकारण वाढविला. एवढा सारा भरणे शेतकऱ्यांना शक्यच नव्हते. सारा कमी करण्याची सरकारला विनंती केली; पण सरकार त्याला तयार होईना शेतकऱ्यांच्यावर हा मोठा जुलूम होता. वल्लभभाईंना हे समजताच त्यांनी शेतकऱ्यांची संघटना केली. त्यांनी शेतकऱ्यांना बजाविले, "काही झाले तरी कोणत्याही परिस्थितीत सरकारला सारा  देऊ नका. सरकारचा हा जुलमी हुकुम मानू नका." शेतकऱ्यांनी सत्याग्रह  पुकारला. सरकारने शेतकऱ्यांचा खूप छळ केला.सारावसुलीसाठी  शेतकऱ्यांच्या घरादरांचा,गुराढोरांचा लिलाव पुकारला; पण लिलाव घ्यायला पुढे आले नाही. सरकारी लोकांवर पूर्ण बहिष्कार टाकला. सरकार हैराण झाले. सर्व शेतकऱ्यांचा एक नारा होता. 'नहीं देगे, नहीं देगे.' बार्डोलीचा सत्याग्रह हा केवळ बार्डोलीचा राहिला नाही. त्याला राष्ट्रीय स्वरूप आले. १२ जून, १९२८हा  दिवस संपूर्ण राष्ट्राने  'बार्डोली दिन’ पाळला. काही झाले की शेतकरी नमत  नाहीत याची खात्री पटली तेव्हा सरकार नमले. त्याने आपला हुकूम मागे घेतला शेतकऱ्यांचा विजय झाला. त्यांनी वल्लभभाईचा  जयजयकार केला. लोक त्यांना सरदार म्हणू  लागले.

वल्लभभाईनी देशासाठी अनेक वेळा कारावास भोगला. १९३१ साली कराची येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर सार्वभौम भारताचे वल्लभभाई पहिले गृहमंत्री झाले.त्यावेळी त्यांच्या पुढे एक मोठे कार्य होते. त्यावेळी या देशात लहानमोठी सातशे  संस्थाने होती.ब्रिटिशांनी जाता जाता त्यांना सार्वभौम अधिकार दिले होते. त्यामुळे ती संस्थाने स्वत:ला  स्वतंत्र समजत होती. ही संस्थाने स्वतंत्र राहणे हे देशाच्या दृष्टीने धोक्याचे होते. वल्लभभाईनी या संस्थानिकांना सज्जड दम भरला; त्यामुळे वठणीवर आलेल्या संस्थानिकांनी आपली संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन करण्यास बिनशर्त संमती दिली. याला अपवाद होता तो हैदराबादचा निजाम. वलभभाईनी बळाचा वापर करून हैदराबाद संस्थानही संघराज्यात विलीन केले. भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र सार्वभौम एकजीव झाला. याचे श्रेय वल्लभभाईनाच द्यावे लागेल. 'भारताचे पोलादी पुरुष ठरलेले वल्लभभाई १५ डिसेंबर, १९५० रोजी निधन पावले.

 

No comments:

Post a Comment

Write a comment.