Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Sunday 26 September 2021

महात्मा गांधी जयंती

 महात्मा गांधी जयंती भाषण

 २ ऑक्टोबर

देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे सेनापती व जगातील परतंत्र लोकांना सत्याग्रहाचा नवा मार्ग दाखविणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधल्या पोरबंदर गावी २ ऑक्टोबर, १८६९ रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई.

शालेय शिक्षणानंतर इंग्लंडला बॅरिस्टर होऊन गांधीजी परत आले. २४ व्या वर्षी ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारासारखे वागविणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील जुलमी गोऱ्या राज्यकर्त्यांविरुद्ध अनेक वर्षे गांधीजींनी लढा दिला. तेथे हिंदी लोकांना संघटित करून 'नाताळ हिंदी काँग्रेस' ही संस्था स्थापून सत्याग्रहाचा नवा मार्ग दाखविला.

१९१५ साली भारतात परत आल्यानंतर ना. गोखल्यांच्या सांगण्यावरून एक वर्ष गांधीजींनी भारतभर प्रवास केला. सामान्य माणसाचे दु:ख, दारिद्र्य पाहून त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत घेतले. १९१७ साली चंपारण्यातील शेतमजुरांना जुलमी इंग्रज मळेवाल्यांविरुद्ध सत्याग्रहासाठी संघटित केले. गांधीजींच्या प्रोत्साहनानेच गुजरातमधल्या खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी लढा दिला.

१९१९ च्या 'रौलट अॅक्ट' च्या काळ्या कायद्याविरुद्ध सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी देशभर दौरा करून, सरकारविरोधी निदर्शने, हरताळ, उपवास इत्यादींनी लोकमत जागृत केले. पंजाबमधील 'जालियनवाला' हत्याकांडाने इंग्रजांची राक्षसी वृत्ती प्रकट झाली. अशा सरकारशी 'असहकार' पुकारण्यासाठी गांधीजींनी आपल्या 'नवजीवन व 'यंग इंडिया' साप्ताहिकांतून सर्वांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. खिलाफत चळवळींस पाठिंबा दिला.

चौरीचौरा गावातील हिंसाचारामुळे गांधींनी चळवळ थांबवली. परंतु राजद्रोहाच्या आरोपाखाली गांधीजींना सहा वर्षांची शिक्षा झाली. १९३० साली गांधीजींनी दांडीयात्रा काढून मिठाचा कायदा मोडून काढला. स्वातंत्र्याची लढाई गांधीजींनी घरोघरी पोचवली. गांधीजी उत्कृष्ट संघटक होते. स्वातंत्र्यलढा लढत असतानाच खादीप्रचार, राष्ट्रीय शिक्षण, शेती, हरिजनोद्धार, निसर्गोपचार, प्रार्थना, स्वच्छता, ग्रामोद्योग, गोपालन, कुष्ठसेवा इत्यादी आघाड्यांवर समाजोद्धाराची कार्ये त्यांनी पार पाडली होती.

टॉलस्टॉय व रास्किन या तत्त्ववेत्यांच्या प्रभावाने त्यांना 'सर्वोदया' चे तत्त्वज्ञान सापडले. 'साबरमती आश्रम सुरू करून स्वावलंबी, सेवामय, त्यागी जीवन ते जगू लागले. खेड्यातील जनतेला मजुरी देण्यासाठी त्यांनी खादी व चरख्याचा गावोगाव प्रसार केला. अस्पृश्यांना 'हरिजन' संबोधून 'हरिजन सेवा संघा'तून दलितोद्धाराचे गांधीजींनी कार्य केले. सत्य, अहिंसेवर त्यांची निष्ठा होती. त्यांच्या आत्मकथेला 'सत्याचे प्रयोग' असे नाव आहे.

भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी ते दोनदा लंडन येथील गोलमेज परिषदेला हजर राहिले. १९४२ ला 'चले जाव' ची घोषणा करून 'करेंगे या मरेंगे' हा नवा मंत्र त्यांनी दिला. ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे या माथेफिने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि एका तेजोमय जीवनाचा अंत झाला!


click here other information 

No comments:

Post a Comment

Write a comment.