Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Tuesday 15 November 2022

डॉ. सी. व्ही. रामन्

 

नोबेल पुरस्कारप्राप्त भारतरत्न डॉ. सी. व्ही. रामन्



आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय विज्ञानाचार्य, जगविख्यात 'रामन् इफेक्ट' चे जनक, नोबेल पुरस्काराचे मानकरी सर चंद्रशेखर व्यंकट रामन् यांचा जन्म ७ नोव्हेंबर, १८८८ रोजी त्रिचनापल्ली येथे झाला. या विज्ञानमहर्षीने आपल्या संशोधनाने भारताला जगातला अद्वितीय असा नोबेल पुरस्कार मिळवून दिला. यांचे वडील विज्ञानाचे अध्यापक होते; त्यामुळे घरातील वातावरण विज्ञानाला पोषक होते. रामन् वयाच्या बाराव्या वर्षी मॅट्रिक झाले व मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून ते 'विज्ञान' विषय घेऊन एम.ए. झाले. याच दरम्यान त्यांनी ध्वनिलहरींसंबंधी नवीन संशोधन करून एक निबंध तयार केला व तो लंडनच्या एका मासिकात प्रसिद्ध झाला. काही दिवसांनी त्यांनी 'प्रकाश' या विषयावर एक प्रबंध लिहिला. तो 'नेचर' या इंग्लिश मासिकाने प्रसिद्ध केला. या निबंधामुळे रामन यांना परदेशात कीती मिळाली. परदेशाच्या मान्यतेची ही सुरुवात केली. रामन यांच्या बुद्धीची चमक त्यांच्या प्राध्यापकांच्या लक्षात आली होती. हा विद्यार्थी विलायतेला गेला तर विज्ञानक्षेत्रात मोठे कार्य करील असे त्यांना वाटत होते. त्यांची विलायतेला जाण्याची सगळी व्यवस्था केली होती; परंतु प्रकृतीच्या कारणास्तव ते त्या वेळी परदेशी जाऊ शकले नाहीत. त्यांनी अर्थखात्याची परीक्षा दिली. त्यात ते पहिले आले. मग त्यांनी ठिकठिकाणी नोकऱ्या केल्या. नोकरीत त्यांचे मन रमेना. खर्डेघाशीचा त्यांना कंटाळा आला. शेवटी १९१४ साली रामन् अर्थखात्यातून आपल्या संशोधनकार्याकडे वळले. कलकत्ता विद्यापीठात त्यांनी आपले संशोधनकार्य सुरू त्यांच्या संशोधनकार्याचे वृत्तांत प्रसिद्ध होऊ लागताच भारतातील विज्ञानप्रेमी विद्यार्थी कलकत्ता विद्यापीठाकडे ओढले जाऊ लागले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून कलकत विद्यापीठाने त्यांना सन्मानाची 'डॉक्टर' ही पदवी दिली

१९२१ साली इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डला शास्त्रज्ञांची परिषद होती. त्या परिषदेला रामन् भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. १९२४ साली कॅनडातही अशीच परिषद होती. त्या परिषदेलाही डॉ. रामन् गेले होते. त्या परिषदांत डॉ. रामन यांनी केलेल्या भाषणान देशोदेशींचे शास्त्रज्ञ अत्यंत प्रभावित झाले. युरोपातून परत येताच डॉ. रामन यांनी नव्या उत्साहाने संशोधनाला सुरुवात केली. भारतातील अनेक विद्यापीठांनी त्यांना व्याख्यानासाठी बोलाविले.

डॉ. रामन यांनी 'प्रकाश' या विषयावर संशोधन केले व त्यांनी जो शोध लावला तो 'रामन परिणाम' (रामन इफेक्ट) म्हणून प्रसिद्ध झाला. १९२८ साली तो सर्वप्रथम भारतीय पदार्थविज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झाला. "मर्क्युरी व्हेपर लॅम्पमध्ये मिळणाऱ्या प्रकाशाकडे आपण एखाद्या प्रिझममधून पाहिले तर तो निरनिराळ्या रंगांच्या पट्ट्यांत विभागलेला दिसतो; पण तोच प्रकाश बर्फ किंवा पाणी यामधून जातो त्या वेळी प्रिझममधून दिसणाऱ्या रंगीत पट्ट्यांत आधी न दिसलेल्या प्रकाशरेषा दिसतात.' हाच तो रामन इफेक्ट. डॉ. रामन यांच्या या शोधामुळे जगाच्या ज्ञानभांडारात मोलाची भर पडली.

डॉ. रामन् यांच्या या संशोधनामुळे त्यांच्यावर जगातून स्तुतीचा आणि पारितोषिकांचा अक्षरश: पाऊस पडला. विज्ञानक्षेत्रात भारत श्रेष्ठांच्या मालिकेतील एक ठरला. १९३० चा पदार्थ विज्ञानाचा नोबल पुरस्कार डॉ. रामन् यांना मिळाला. १९३३ साली डॉ. रामन् बंगलोरच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' या संस्थेचे अध्यक्ष झाले. डॉ. रामन् यांच्या प्रेरणेने १९४४ साली 'इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्स' ची स्थापना झाली. जगातल्या अनेक देशांनी त्यांना अनेक सन्मान्य पदव्या दिल्या. १९३५ साली म्हैसूरच्या महाराजांनी त्यांना राजसभाभूषण किताब दिला. भारत सरकारने १९५४ साली त्यांना 'भारतरत्न' ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. सतत संशोधन विषयात रमणारे डॉ. सी. व्ही. रामन २१ नोव्हेंबर, १९७१ रोजी निधन पावले. भारतीय विज्ञानाकाशातील एक तेजस्वी तारा निखळून पडला.




No comments:

Post a Comment

Write a comment.