Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Thursday 12 January 2023

मकरसंक्रांत - १४ जानेवारी

 

 

 मकरसंक्रांत - १४ जानेवारी

हार्दिक शुभेच्छा

 


 

संक्रांत म्हणजे संक्रमण, सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याच्या क्रियेस संक्रमण म्हणतात. सूर्य मकर राशीत आला की मकरसंक्रांत येते. या दिवसानंतर सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो व दिवस थोडा-थोडा मोठा होऊ लागतो. संक्रांत या सणाची मराठी महिन्यातील तिथी दिवस असा निश्चित ठरलेला नाही. पण टिळक पंचांगाप्रमाणे – १०  जानेवारीस आणि जुन्या पंचांगाप्रमाणे १४ जानेवारीस हा सण येतो.

            मकर संक्रांतीविषयीच्या अनेक कथा आहेत. पूर्वी संकरासुर नावाचा दैत्य होता. तो खूप माजला होता. त्याचा नाश करण्यासाठी संक्रांती देवीने भयंकर रूप धारण केले, इतके की ही देवता साठ योजने पसरली होती. तिचे एक, ओठ लांबलचक होते. ती नऊ हातांची व तिची आकृती पुरुषाची होती. दरवर्षी तिचे वाहन, वस्त्र व अलंकार वेगवेगळे  असतात. आपले अलंकार वस्त्र यातून ती भावी संकट सुचवीत असते. एखाद्या वाहनावर बसून ती एका दिशेने येते. पण त्या दिशेकडे समृद्धी येते व जिकडे जाते तिकडे संकट कोसळते. यावरून 'संक्रांत येणे' म्हणजे संकट देणे असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. तिने अंगावर घातलेल्या वस्तू महाग होतात असे समजतात.

संक्रांतीचा हा सण तीन दिवसांचा असतो. पहिला दिवस भोगी. या दिवशी खिचडी, तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी व वांगी, पावटे, गाजर, पापडी शेंगा इ. ची भाजी करतात. दुसऱ्या दिवशी महत्वाची संक्रांत! थंडीच्या या दिवसामध्ये शरीराला स्निग्ध, मधुर, पौष्टिक पदार्थांची गरज भासते म्हणूनच की काय या दिवशी गुळपोळ्या तिळगुळाचे लाडू, वड्या करून 'तिळगूळ घ्या, गोड बोला' असे म्हणून सर्वांना तिळगूळ देण्याची प्रथा पडली. स्नेहभाव, आपुलकी वाढविणारा हा सण आहे. तिसऱ्या दिवशी किंक्रांत किंवा करिदिन या दिवशी प्रवासाला जाऊ नये म्हणतात. अनिष्ट परिणामांची बाधा होऊ नये म्हणून लहान मुलांना या दिवशी बोरनहाण घालण्याची प्रथा आहे.

नव्याने लग्र झालेल्या मुलीला हलव्याचे दागिने घालून सजवतात. जावयाला भेटवस्तू देण्याची पद्धतही महाराष्ट्र आहे. काहीजण रथसप्तमीपर्यंत आपल्या आप्तेष्ट-स्नेह्यांना 'तिळगूळ भेटकार्ड' शुभेच्छा पाठवतात. संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या चित्राची पूजा सुवासिनी करतात. गूळ तीळ किंवा गुळपोळ्याचा नैवेध्य दाखवून संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलवून ऐपतीप्रमाणे वाण देतात. शिवाय एका मातीच्या मडक्यात किंवा सुगडामध्ये सुगीच्या दिवसातील , गाजर, शेंगा, हरभरा, गहू इ. ठेवून पूजा करतात. म्हणजेच मागील भांडणे तंटे,मनातील व्देष, वैर, मत्सराची भावना यांना 'तिलांजली' देऊन सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने वागा असेच जगू आपणाला सांगत असते! या मकर संक्रांतीच्या शुभदिनी स्त्रियांच्या मनातील पूर्वापार संकल्पनांमध्ये काही बदल घडायला हवेत. फक्त 'सुवासिनींसाठी' साजरा होणारा हा सण सर्व स्त्रियांना सामावून घेणारा ठरावा. संक्रांतीचे 'वाण' गरजू स्त्रिया व होतकरू हुशार मुलींसाठी दान स्वरूपात अर्पण करण्यात आले तर समाजात एक नवीन पद्धत रुजविल्याचे सार्थ समाधान मिळेल!

 

No comments:

Post a Comment

Write a comment.